मोरिंगा शेवग्यावर मी केलेला प्रयोग

श्री. हनमंत नारायण जगताप, मु. पो. बेलसर ता.पुरंदर

जि.पुणे फोन: (०२०) २६९९४३६४

बेलसर भागामध्ये पाण्याचे फार दुर्भिक्ष असल्याने भाजीपाला पिके किंवा इतर पाण्याची पिके फार कमी प्रमाणात घेतली जातात. त्यावर मी आपल्या कृषी विज्ञान मासिकात माहिती वाचली तर, दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यावर शेवगा हा कल्पवृक्ष आहे. शिवाय कुठल्याही जमिनीत येऊ शकतो. त्यामुळे शेवगा पीक करण्याचे ठरविले.

१ एकर जमीन अर्धलीन दिली होती. त्यात टोमॅटो कोबी, बांगी ही पिके घेतली जात होती. आणि तो माणूस माल परस्पर विक्री करत असे. आता तर भैंय्ये लोक माल शेतावर येऊन घेऊन जातात. तर त्या मालाची पट्टी जर २०० रू. ने काढली तर १५० रू. असा नेहमी कमी भाव सांगत असे. त्यामुळे या शेतीतून आम्हांला काहीच फायदा होत नसे. म्हणून स्वत: शेती करण्याचे ठरविले.

आपल्याकडून मोरिंगा शेवग्याची ८ पाकिटे घेतली होती. आपल्या पद्धतीने जर्मिनेटर लावून रोपे तयार केली. नंतर १ महिन्याने (जून २००१ मध्ये) ती रोपे ८' x ८' वर लावली. शेवग्यावर पंचामृताच्या मासिकात दिल्याप्रमाणे तीन फवारण्या केल्या व कल्पतरू खताची मात्रा दिली. पहिल्या वर्षी झाडाची पूर्ण वाढ झाली नव्हती. त्यामुळे छाटणी करू शकलो नाही. या वर्षी या झाडांची वाढ जोरदार झाली आहे. त्यावर फवारणी करण्याकरता नोझलला कळक (बांबू) बांधून फवारणी करावी लागत होती. शेंगाची तोडणी लागवडीनंतर ६ - ७ महिन्याने चालू झाली. शेंगा हडपसर, सासवड मार्केटला पाठवित होतो. झाडे शेंगांनी लगडलेली होती. २० ते २५ किलो माल एका झाडावर होतो. २०० ते २५० रू. भाव सापडत असे. पहिला बहार संपल्यावर मे महिन्यात छाटणी केली तर लांब फांद्याचा उपयोग टोमॅटोला आधार देण्यासाठी झाला. त्यामुळे ३ - ४ हजार रुपये कळक घेण्यासाठी येणारा खर्च वाचला. ही लाकडे ठिसूळ असल्याने एकच वर्षे वापरली जाऊ शकतात.

यातील १० झाडे तशीच न छाटता ठेवली होती. त्यामध्ये असे आढळले की, या झाडांना फवारणी करता येत नसल्याने रोग कीड येत असे. त्यामुळे त्यापासून उत्पादन कमी निघते तर छाटणी केलेल्या झाडांना ८ - १० फुटवे येतात आणि या फांद्यांना फुलकळी व शेंगा भरपूर येतात. तर सप्टेंबर मध्ये दुसर्‍या बहराच्या शेंगा चालू झाल्या. या शेंगांची क्वालिटी चांगली म्हणजे हिरव्यागार शेंगा, मगज भरपूर व वजनदार, दीड ते दोन फुटाच्या होत्या. त्यामुळे मार्केटमध्ये आपला माल उठून दिसत असे. हा माल चालू होऊन ६ महिने झाले. आठवड्यातून एकदा तोडा करतो. शेंगा सकाळी १० वाजेपर्यंत तोडतो. आदल्या दिवशी तोडणी केली तर शेंगा सुकते. सकाळी तोडल्यावर, पोत्याचे तोंड शिवुन आडवी बाजू (रूंद बाजू) फाडुन त्यात आतल्या बाजूला शेंगाचे शेंडे करून मालाचे पॅकिंग करतो. त्यामुळे शेंडे मोडत नाहीत. नंतर पोते शिवताना तोंडाला केळीचे सोपट, चंदन किंवा कडू लिंबाचा पाला टाकून शिवतो व त्यावर पाणी मारतो. या पद्धीतीने माल जास्त बसतो. कुठेही पाठवू शकतो व दोन दिवस ही शेंग सुकत नाही. तांदळाच्या पोत्यात ४५ ते ५० किलो शेंग बसते व घेणार्‍यालाही ते पोते घेणे परवडते. साखरेच्या मोठ्या बारादान्यात ७० - ७५ किलो शेंग बसते. पण ते उचलताना अथवा वाहतुकीला अवघड जाते. त्यामुळे शक्यतो लहान पोत्यातूनच शेंगांचे पॅकिंग करावे. इतर भाजीपाल्यापेक्षा पाणी कमी, खर्च कमी, आणि कष्ट ही कमी व एकरी बहारापासून ६० - ७० हजार रू. नफा निष्चित मिळाला.

New Articles
more...