वकिली करण्यापेक्षा शेवग्याची शेती देते कष्टाचा पैसा व आत्मीक समाधान

अड. देविदास शंकरराव खिलारे, मु.पो. सोनवडी बु ||, ता.फलटण, जि.सातारा मो. ९८२२७३०६३७

२००६ साली ऑगस्टमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ६८० मोरिंगा शेवग्याची लागवड सरांच्या तंत्रज्ञानाने केली आहे. शेवग्याच्या बाबतीत सर्वात महत्वाचे काम म्हणजे छाटणी. ज्याला छाटणी वेळेवर जमणार नाही. त्याने शेवगा लावू नये, हे माझे स्पष्ट मत आहे. आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे छाटणीचे तंत्र पूर्णपणे सांभाळले. शेवगा पुस्तकात जरी ७ महिन्यांनी शेंगा तोडणीस येतात, असे लिहिले असले तरी आमच्या शेंगांचा तोड ६ व्या महिन्यातच झाला. फेब्रुवारी २००७ मध्ये चालू झालेला माल २-३ महिने दररोज चालू होता. त्यावेळी उन्हाळा असल्याने आम्ही उसासारखे मोकाट पाणी पूर्ण गारा होईपर्यंत देत असत. मात्र त्यामुळे बरीच तुटाळ झाली. आता ४००-५०० च झाडे राहिली आहेत. आम्हाला पहिल्या बहाराला छाटणीचे तंत्र अगवत झाले. मात्र पाण्याचे नियोजनात आम्ही मार खाल्ला. त्यामुळे उत्पादन सरांनी सांगितल्याप्रमाणे मिळाले नाही, तरी मिळालेले उत्पादन आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच होते, शिवाय बाजारभावही २० ते ३० रू./ किलो मिळाल्याने चांगले पैसे झाले.

काम कामाचा गुरू

पहिल्या बहारात आमच्या ज्या चुका झाल्या त्या आम्ही आमच्या अनुभवातून तसेच सरांच्या सल्ल्यानुसार दुसर्‍या बहराच्या वेळी दुरूस्त केल्या. 'काम कामाचा गुरू' या उक्तीप्रमाणे मोकाट पाण्यामुळे गेल्यावर्षी जी शेवग्याची खोडे सडून तुटाळ झाली तसेच उत्पादनात काही प्रमाणात घट आली, त्यावर उपाय म्हणून छाटणी केल्यानंतर झाडांच्या ओळीला झाडाला खोडापासून १|| फुटावरून दोन्ही बाजूने तास मारून खोड ३ फूट रुंदीच्या वरंब्यावर घेऊन दोन्ही बाजूच्या दांडाने पाणी सोडतो. सबमर्शिबल ५ हॉर्सपॉंवरची मोटर आहे आणि पूर्ण शेवग्याच्या प्लॉटला १२ दांड आहेत. शेंगाची तोडणी ऑगस्ट २००७ पासून चालू झाल्यापासून या दांडाने आठवड्यातून एकदा जानेवारीपर्यंत पाणी देत होतो. १ तासात पूर्ण क्षेत्राच्या सर्‍या ओल्या होत असत. पाणी देऊन होईपर्यंत मागे शेतात एक थेंबही पाणी साचत नसे. शिवाय खोडाला अजिबात पाणी लागत नसे, त्यामुळे सतत वाफसा अवस्था राहिल्याने शेंगा हिरव्यागार, रसरशीत निघत. अशा शेंगांना ऑगस्ट ते जानेवारी २००८ पर्यंत ३० ते ३४ रू. भाव फलटण मार्केटला मिळत असे. पुण्यापेक्षा किलोमागे साधारणपणे ५ रू.भाव कमी मिळतो. मात्र पुण्याला माल पाठवायचे झाले, तर ५ रू. हून अधिक खर्च पट्टीतून वजा होतो. म्हणून स्थानिक मार्केट परवडते. आम्ही शिंदे बंधु व्हिजीटेबल फ्रुटमर्चंट गाला नं.२० कृ.उ.बा.स. मार्केटयार्ड, फलटण यांच्याकडे माल पाठवितो. उन्हाळा असूनही पाण्याच्या नियोजनामुळे शेंग हिरवीगार, चमकदार आहे.

तोड दररोज करत आहे. दुपारी ४ नंतर मी आणि माझी पत्नी शेंगा तोडतो. ३० - ४० किलो शेंगा सध्या (मार्च) दररोज निघतात, थंडीत शेंगा २०-२५ किलो, निघत मात्र बाजारभाव ३० ते ३४ रू. किलो मिळायचा. फेब्रुवारीपासून उन चालू झाल्याने शेंगा जादा ३० -४० किलो दररोज निघतात, पण भाव १३ ते १५ रू. किलो झाला आहे. तरी दररोज कोणताही खर्च नसताना ६०० -७०० रू. मिळतात. थंडीत उत्पादन २० ते २५ किलो मिळून दर ३० रू. प्रमाणे ६०० रू. उत्पन्न मिळत. तेच उन्हाळ्यात ३० ते ४० किलो उत्पादन मिळाल्याने त्याला १५ रू. किलो भाव मिळाला तरी ४५० ते ६०० रू. होतात. म्हणजे भावात चढ-उतार झाला तरी उत्पादन वाढल्याने उन्हाळ्यातही थंडीत मिळाले, तेवढेच पैसे दररोज मिळतात. सध्या आठवड्यातून २-३ वेळा दांडाने पाणी देत आहे. रानाला उतार असल्याने पूर्ण १२ दंडाला थोडे-थोडे पाणी लावतो. त्यामुळे पाणी मुरते. तरी १ तासात पूर्ण भिजते व मुळाजवळ पाणी न दिल्याने सतत वापसा अवस्था राहते. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात वाढ झाली. बाजार जून ते ऑगस्ट या महिन्यांत ३० ते ३५ रू. किलो, ऑगस्ट ते जानेवारी २० ते २५ रू. किलो तर जानेवारी ते मे १० ते १५ रू. किलो असा (फलटणला) असतो. तसेच जेव्हा टोमॅटो २ रू.किलो, कांदा १ रू. किलो होतो तेव्हा शेवग्याला १० रू. किलो भाव मिळतो. त्यामुळे शेवग्याएवढा भाव कोणत्याच भाजीला मिळत नाही. अगदी वाटाण्याला देखील मिळत नाही, हा माझा अनुभव आहे.

हा शेवगा प्लॉट पाहण्यासाठी आतापर्यंत १ हजारहून अधिक लोक आले असतील फलटणचे श्री. बाबुलाल गांधी वय वर्ष ८० यांची शेती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून शेतकरी येतात आणि ते जेव्हा आमचा शेवगा पाहण्यासाठी शेतावर आले. तेव्हा मनोमनी आनंद वाटून आपण कुठेतरी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने चांगल्या वाटेवर आहोत, याचे समाधान मिळाले. वकिलीत मन रमत नसल्याने ८५ साली वकिली सोडून शेती करू लागलो. परंतु २५ वर्षाच्या या काळात शेतीतून असा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच या तंत्रज्ञानामुळे आला. वकिलीच्या पेशापेक्षा कष्टाने ह्या शेव्ग्यापासून मिळालेल्या पैशाने आत्मिक समाधान मिळत आहे.

New Articles
more...